Friday, October 24, 2014

जो बात तुझ में है……साहिर लुधियानवी 

ये महलो ये तख्तों ये ताजों की दुनिया
ये इंसा के दुश्मन समाजो की दुनिया
ये दौलत भूखे रवाजो की दुनिया
ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है

हे पैशाच्या जोरावर चालणारं व माणुसकी सोडून वागणारं जग आहे. या जगात आमच्या सारख्या गरिबांना काय मिळणार? हा गुरुदत्तनी विचारलेला परखड सवाल किंवा "हर चीज़ है दौलत वालो की,मुफ़लिस का सहारा दिल ही तो है" हे राज कपूरनी मांडलेलं सत्य,एका तिखट लेखणीतून आलेलं होतं.ती लेखणी ज्याची होती,त्याला आपण एक विद्रोही कवि म्हणूनच ओळखतो।

हो,साहिर लुधियानवी हे त्याचं नाव. या नावा बरोबर सदैव जुळली आहे ती एका वेगळ्या आणि दर्जेदार शायरीची अपेक्षा। साहिर म्हणजेच उर्दू भाषेत जादुगार। शब्दाचा लीलया खेळ करणारा।नुसतच मनोरंजन नाही तर आपल्या शायरीतून  सामाजिक भान जपणाऱ्या साहिरचं खरं नाव अब्दूल हयी आहे. ८ मार्च १९२१ चा त्याचा जन्म पंजाब मधील लुधियानातला। आयुष्याचा खडतरपणा साहिरनी अगदी लहानपणीच पाहिला।त्याच्या आई-वडिलामधे होणाऱ्या सततच्या भांडणांमुळे त्याच्या मनात एक असुरक्षेची भावना निर्माण व्हायला लागली।साहिर जेव्हा अवघा १३ वर्षाचा होता तेव्हा त्याचे आई-वडील विभक्त झाले।साहिर आई सोबत राहू लागला।त्याच्या हयाती मधे त्याने आईची साथ कधीही सोडली नाही।

पुढे साहिरचं शिक्षण लुधियाना आणि लाहौर येथे झालं। शिक्षणापेक्षा साहिरला काव्य प्रतिभाच जास्त साद घालत होती।"तल्ख़ियां" या त्याच्या पहिल्या काव्यसंग्रहानी साहिरला नाव मिळवून दिलं।१९४७ ला देशाची फाळणी झाली,साहिर लाहौर मधेच होता।सवेरा या त्याच्या लेखा मधून त्याने पाकिस्तानी व्यवस्थे विषयी कडवट असं लिखाण केलं।त्याचा परिणाम म्हणून पाकिस्तान सरकारने साहिर विरुद्ध अटक वारंट काढला। शेवटी साहिर पाकिस्तानातून कसाबसा निसटला व दिल्लीला येवून पोहोचला।

मुंबईची मात्र त्याला जबरदस्त ओढ़ होती।मुंबईला माझी गरज आहे असं नेहमी त्याला वाटायचं। स्वताच्या शायरी वर त्याला आत्मविश्वास होता।  मुंबईच्या सीने सृष्टीनेही साहिरला  निराश केलं नाही। आज़ादी की राह पर या चित्रपटसाठी साहिरनं पहिल्यांदा गाणी लिहिली,साल होतं १९४९. पण साहिरचे खरे पारखी ठरले ते संगीतकार सचिन देव बर्मन।नौजवान या चित्रपटसाठी साहिरनी लिहिलेलं "ठंडी हवाये,लहरा के आये" साहिरचं नाव करून गेलं।गुरुदत्त ची नजर साहिर वर पडली।गुरुदत्तच्या बाज़ी मधे त्याने साहिरला मौका दिला।पुढे १९५७ मधे आलेला "प्यासा" मात्र साहिर आणि गुरुदत्तच्या आयुष्यामधे कमाल करून गेला।

गुरुदत्तच्या सोबतच साहिरचे गुण ओळखणारे अजून एक व्यक्ति म्हणजे बी.आर.चोप्रा। चोपरांच्या बहुतांश
चित्रपटांसाठी साहिरनी एक से एक गाणी लिहिली आहेत।गुमराह,वक़्त,हमराज,नया दौर,इन्साफ का तराजू कितीतरी नावं घेता येतील। कुठलाही गाणं घ्या,प्रत्येक गाण्यात साहिर आपली हुकूमत गाजवतोच।संगीतकार रविचाही "नया दौर" वगळता तेवढाच मोलाचा वाटा आहे या यशात।

अजुन एक श्रेष्ठ मिलापाचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे रोशनच्या संगीताला साहिरच्या शब्दांची जोड़. बरसात की रात,आरती,ताज महल,भीगी रात,चित्रलेखा हे सगळंच सौंदर्यानी नटलेलं होतं।पण दुर्दैवानी रोशनचं अकाली झालेलं निधन,रसिकांच्या पदरात फार मोती टाकू शकलं नाही।

ओ पी नय्यर(नया दौर,सोने की चिड़िया),ख़य्याम(फिर सुबह होगी,त्रिशूल),लक्ष्मीकांत प्यारेलाल(दाग,इज्जत),राहुल देव बर्मन(बर्निंग ट्रेन,दीवार),राजेश रोशन(कला पत्थर) अशा तमाम संगीतकारांनी साहिरच्या शब्दांना सुरावट दिली आहे.

साहिरच्या विचारसरणीची आणि त्याच्या काव्य श्रेष्ठत्वाची बोलक्या उदाहरणांवरही एक नजर टाकणं
आवश्यक आहे.

वो अफ़साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमक़िन.... गुमराह
कहने की जरूरत नहीं,आना ही बहुत है। … नया दौर
गेसू खुले तो शाम के दिल से धुवा उठे.... आरती
मै तेरे दर पे आया हु। कुछ कर के जाऊंगा। … लैला मजनू
ओ सारे जग के रखवाले,निर्बल को बल देने वाले।  हम दोनों
कौन कहता है के चाहत पे सभी का हक़ है। …ग़ज़ल
रात भर का है मेहमां अँधेरा। .... सोने की चिड़िया
आगे भी जाने ना तू,पीछे भी जाने ना तू। .... हमराज

ताजमहल आणि कभी कभी साठी त्याला फिल्मफेयर पुरस्कार मिळाले।तसेच १९७१ मधे  भारत सरकारने पद्मश्री देवून साहिरच्या कामाचा गौरव केला।

साहिरची प्रेरणा जशी त्याची आई होती,तसंच त्याला न मिळालेली अमृता प्रीतम सतत त्याच्या आयुष्याची घालमेल वाढवत होती होती।अमृता साठी साहिर कायमचा अविवाहीत राहीला।आयुष्यभर ते दोघही एकमेकांवर प्रेम करत राहिले पण कधीच एकत्र येवू शकले नाहीत। प्रेम मिळालं नाही,तेव्हा साहिर व्यसनी होत गेला।धूम्रपानाची अत्याधिक सवय त्याचा हळूहळू घात करत होती।

शेवटी २५ अक्टूबर १९८० ला आपली अफाट अशी शब्द-संपत्ति मागे ठेवून साहिर निघून गेला।रफ़ी साहेब साहिरच्या केवळ तीन महीने आधीच गेले होते. सुरांच्या त्या बादशहाला शब्द कमी पडू नयेत म्हणून की काय
साहिरलाही विधात्यानी बोलावून घेतलं असावं।

उतनाही उपकार समझ,जितना साथ निभा दे..... 
 असं एकमेकांना समजावत,ते शब्द-सुरांचे खजिने अजूनही परमात्म्या समोर उलगडून दाखवत असतील।

साहिरच्या ३४ व्या स्मृतिदिनी आदरांजली।।।।

मनीष गोखले 
पुणे 
९८२२८५९२७० 








      

No comments: