Tuesday, July 19, 2016

स्वर्गीय मदन मोहन यांच्या पुण्यतिथी दिवशी म्हणजेच १४ जुलै रोजी कोथरूड भागातल्या यशवंतराव नाट्यगृहामध्ये 'मुहब्बत- आगाज़ फिर एक अफ़साने का' विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संकल्पना, निर्मिती आणि निवेदन हेमा शर्मा यांचं होतं. प्रेम आणि प्रेमाच्या विविध छटांचा इंद्रधनू कलेच्या आकाशात निर्माण केला तो पुण्यातील आजच्या आघाडीच्या कलावंतांनी. गोड आवाजाच्या गायिका प्रीती पेठकर तसेच गायन कलेत अत्यंत सक्षम असलेले संतोष भालेराव, अजय राव आणि जयेश शिंपी यांच्या आवाजाने सजलेल्या या महफिलीचा आस्वाद जमलेल्या रसिकांनी भरभरून घेतला. या सुंदर कार्यक्रमाची सुरवात 'जब प्यार किया तो डरना क्या' लताजींच्या ऐतिहासिक गीताने झाली. त्यांनंतर एकापेक्षा एक मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांचं दालन रसिकांसाठी खुलं करण्यात आलं. 'तुझ को पुकारे मेरा प्यार', 'क्या मौसम है', 'जो वादा किया वो निभाना पड़ेगा', 'प्यार हुवा चुपके से' व सर्वच गायकांचा सहभाग असलेलं 'आती रहेंगी बहारें अशा प्रकारची अप्रतिम गाणी कलाकारांबरोबरच रसिकांनी देखील गुणगुणली. पल्लवी राव यांच्या यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या दृक-श्राव्य व्यवस्थेमुळे कार्यक्रमाची रंगत अधिक वाढली. एकंदरीत हेमा शर्मा यांनी सादर केलेला हा आगळा वेगळा प्रयोग निश्चितच वाखाणण्याजोगा होता.   




No comments: