Tuesday, November 24, 2015

दरवर्षी दिवाळी घरी-दारी आनंद घेवून येते। आपण सर्वजण मोठ्या आतुरतेने या सणाची वाट पाहत असतो।दिवाळीच्या निमित्ताने एक चैतन्य आपण अनुभवत असतो। नव्या उमेदीची,नव्या क्षणांची ही पहाट हळूहळू नूतन वर्षाची दारं उघडून देत असते।नवे कपडे,दिवाळीचा फराळ,आप्तेष्टांच्या गाठीभेटी दीपावलीचा अविभाज्य भाग असतात।पण रसिक वाचकाचं मन मात्र दिवाळीच्या मुहूर्तावर येणाऱ्या दिवाळी अंकांची वाट पाहत असतं।सगळेच दिवाळी अंक विकत घेणं शक्य होत नाही,तेव्हा ग्रंथालयं काही माफक रकमेच्या मोबदल्यात आपल्याला ते उपलब्ध करून देतात।एकंदरीत हा साहित्य फराळ पुढचे काही महीने तरी आपली सोय करत असतो।

दिवाळी अंकामधे लिखाण करावं हे तर प्रत्येक लेखकाचं स्वप्न असतं।त्या निमित्ताने त्याला हव्या त्या विषयावर विस्तृत लेखन करता येतं आणि मोठा वाचकवर्गही मिळतो।माझ्या सारख्या नवोदित लेखकालाही या वर्षी दोन दिवाळी अंकांमधे लिहिण्याची संधी प्राप्त झाली।जेष्ठ पत्रकार श्री अरुण खोरेजी आणि पुण्यातील जेष्ठ वकील शिरीष शिंदेजी यांच्या सहकार्याने हे शक्य झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।

श्री अरुण खोरे यांच्या 'लोकशाहीसाठी समंजस संवाद' या दिवाळी अंकात मी रफ़ी साहेबांच्या जन्म गावाविषयीचा माझा अनुभव मांडलेला आहे.काही वर्षांपूर्वी या महान पार्श्वगायकाच्या प्रेमाची ओढ़ मला तिथे घेवून गेली।रफ़ी साहेबांचा ज्यांना सहवास लाभला आहे,अशा काही मंडळींना भेटण्याचा योग या निमित्ताने आला।'लोकशाहीसाठी समंजस संवाद' हे एक उत्कृष्ठ दिवाळी मासिक आहे. स्वत: श्री अरुण खोरे यांनी बिहारच्या निवडणुकीचं केलेलं अप्रतिम विश्लेषण असो किंवा महान गायिका भारत रत्न एम एस सुबलक्ष्मी यांच्या  जीवनाचा आढावा घेणारा लेखिका सुलभाताई तेरणीकर यांचा लेख असो,वाचकांना समृद्ध करणारे असे अनेक लेख या दिवाळी अंकात आहेत।

२०१५ हे 'साहित्य लोभस'चं २३ वं वर्ष।श्री जयंत शिंदे आणि जेष्ठ वकील शिरीष शिंदे यांचं संपादन आणि मार्गदर्शन लाभलेली ही साहित्य मैफल.जेष्ठ लेखक राजन खान,उत्तम कांबळे,द मा मिरासदार अशा दिग्गजांच्या लेखणीने समृद्ध झालेला आणि शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीवर अचूक प्रकाश टाकणारं मुखपृष्ठ असलेला हा एक उत्तम दर्जाचा दिवाळी अंक म्हणता येईल,यात शंका नाही।
आदरणीय शिरीष शिंदे जी,हे नेहमीच नवोदित साहित्यकारांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत।कौतुकाची पाठीवर थाप देवून वेळोवेळी त्यांनी माझाही उत्साह वाढवला आहे,त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे।२०१४ च्या 'साहित्य लोभस' मधे मला पहिल्यांदा लिहिण्याची संधी मिळाली।या वर्षी 'माणसाला समजून घेताना' या लेखातून मी माझे विचार मांडले आहेत।मनुष्याने दाखवलेली थोडीशी समजूतदारी कशी त्याच्या सोबत अनेक लोकांचं आयुष्य सुसह्य करू शकते या तत्वाचा आधार घेऊन मी आपलं मत व्यक्त केलं आहे.

मला दिवाळी अंकांमधे लेखनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी श्री अरुण खोरे आणि शिरीष शिंदे यांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच 'लोकशाहीसाठी समंजस संवाद' आणि 'साहित्य लोभस' या दोन्ही दिवाळी मासिकांना शुभेच्छा देतो। 
  



              

No comments: