Thursday, December 24, 2015

आज २४ डिसेम्बर।९१ वर्षापुर्वी म्हणजेच १९२४ ला याच दिवशी अमृतसर जवळच्या कोटला सुल्तानसिंग नावाच्या खेड्यात एका मुलाचा जन्म झाला।जेव्हा तो ७-८ वर्षाचा होता,तेव्हा त्या गावात रोज एक फ़क़ीर यायचा।दारोदार भटकत पंजाबी सूफी भजनं म्हणत भिक्षा मागत पुढे जायचा। या छोट्या मुलाला त्या फकीराची गाणी खुप आवडायची।मग त्या सुरांच्या ओढ़ीनं,कळत नकळत तो गावच्या वेशी पर्यंत त्या फकीराच्या मागे मागे जायचा।त्या फकीराचं हे ऋण,तो मुलगा आयुष्यभर विसरला नाही।त्या छोट्या मुलाचा तो फ़क़ीर म्हणजे पहिला गुरु होता।त्या फकीराचं पुढे काय झालं,माहित नाही।हा मुलगा मात्र पुढे मोहम्मद रफ़ी म्हणून पुढे नावरूपास आला. त्याने सुरांचं जग काबिज केलं।पण एवढाच त्याच्या आयुष्याचा पैलू नव्हता।जेवढा तो गायक म्हणून मोठा झाला,कदाचित एक फ़रिश्ता म्हणून त्याच्याकड़े अधिक पहिल्या गेलं।व्यक्ती कोणीही असो त्याने सर्वांना सन्मानानेच वागवलं।अफाट यश आणि एवढी विनम्रता,याचं तो एक अफ़लातून मिश्रण होता।त्याच्या संपर्कात आलेला प्रत्येक माणुस हा मनापासून त्याचाच होऊन गेला।अवघं ५५ वर्षाचंच आयुष्य त्याला मिळालं।पण जेव्हा तो गेला,सर्वांच्याच डोळ्यात एक न संपणारा शोध देऊन गेला।

गोष्ट १९६३ ची आहे.त्या दिवशी मुंबईमधे वादकांचा संप होता।त्यांच्या काही मागण्या होत्या।शंकर जयकिशन नेहमी प्रमाणे आपल्या स्टूडियो मधे पोहचले।स्टुडिओच्या दरवाज्यात सगळे वादक ठिय्या देऊन  होते।शंकर जयकिशन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते।पण त्यांचे हे प्रयत्न व्यर्थच ठरत होते । शेवटी जयकिशनने रफ़ी साहेबांना,आज रिकॉर्डिंग होणार नाही असा निरोप देण्यासाठी फोन लावला।तेव्हा त्यांच्या घरुन कळलं की रफ़ी नुकतेच स्टूडियोसाठी निघाले आहेत।त्यांनाही शंकर जय प्रमाणे या संपाची कल्पना नव्हती।इकडे संप मागे घेण्याचे शंकर जयचे प्रयत्न सुरूच होते। तेवढ्यात रफ़ी साहेबांची गाडी आली.आज रफ़ी साहेब गाणार आहेत,हे कळल्यावर मात्र सर्व वादक आपल्या व्यवहाराबद्दल ख़जिल झाले। स्टूडियोचे दरवाजे उघडण्यात आले.साधारण चार तासात गाणं रिकॉर्डही झालं।रफ़ी साहेब सर्वांचे आभार मानून निघून गेले।पुन्हा वादकांचा संप सुरु झाला।

झाल्या प्रकाराबद्दल शंकर जयला अजिबात आश्चर्य वाटलं नाही,किंवा रागही आला नाही।जिथे रफ़ी हे नाव आहे,तिथे प्रेमाचा झरा आहे,याची त्यांना जाणीव होती।हो,रफींच्या माणूसकीची अशी अनेक उदाहरणं आहेत।इतकं असूनही या मतलबी दुनियेत रफ़ी साहेबांनी अनेक अपेक्षाभंग,अनेक मानसिक आघात झेलले,पण त्यांच्या मनातील गोडवा कधीही कमी झाला नाही।याच गोडव्याला,आज त्यांच्या जयंती निमित्त पुन्हा अभिवादन करू या,सलाम करू या.

आणि हो,वर उल्लेख केलेलं ते गाणं,तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचं,.... म्हणजेच

याद न जाये,बीते दिनों की..... ( दिल एक मंदिर)




    

No comments: