Wednesday, November 11, 2015

बुरा जो देखन मैं चला
बुरा न मिलिया कोई
जो मन खोजा आपना
मुझ से बुरा न कोई

संत कबीर,आपल्यालाच आपल्यामधे डोकवायला शिकवतात।सदैव दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ पाहायची सवय लागलेल्यांच्या डोळ्यांमधे घातलेलं अति आवश्यक अंजन आहे ते. आपण केलेल्या चूका,आपण मान्य न करता,खुप सहज पणे त्याचा दोष दुसऱ्यावर थोपवतो।स्वत:लाच स्वत: पासून वाचवण्याचा तो एक सोपा मार्ग असतो।सगळी गणितं तिथेच बिघडत जातात।गोष्टी साचत जातात।चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट, एवढं साधं सोपं तर उत्तर असतं।पण चांगलं ते माझं आणि चुकीचं ते दुसऱ्याचं, असं म्हणत आपला अहंकार आपल्याला निसरड्या वाटेवर ढकलून मोकळा होतो आणि पुढे तर सगळी दलदलच असते।

आपणच आपल्याला अनेक गोष्टींमधे विभागून घेतो।मी या पक्षाचा,या जातीचा,या प्रदेशाचा असा एकदा स्वत:वर शिक्का मारून घेतला की आपआपल्या बाजूंचं कुठल्याही परिस्थितीत समर्थन करायला आपण मोकळे होतो।चुकीच्या गोष्टींचं केलेलं समर्थन कधी ना कधी आपल्यालाच त्रास दायक ठरतं।शेवटी प्रत्येक गोष्ट वैयक्तिकच असते।जरा सूक्ष्म विचार केला तर सहज ही गोष्ट आपल्या ध्यानात येईल।त्यामुळे विचार करून बोललं पाहिजे,कृती केली पाहिजे।

दिवाळी आहे,घरात दारात दिव्यांची आरास आहे.शुभेच्छांची देवाण घेवाण पण आहे.पण समजूतदारीची एक पणती अजूनही आपल्या मनात तेवण्याची वाट पाहते आहे.चांगल्याचं मनापासून,मन भरून कौतुक करू,चुकलेल्याला योग्य ती वाट दाखवू .एखादी प्रिय वा अप्रिय घटना (वैयक्तिक किंवा सामाजिक) आपल्या सोबत जेव्हा घडते,तेव्हा उगीचच काही घडत नसतं,याचं भान ठेवायला हवं.चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींसाठी काही ना काही प्रमाणात आपणही जबाबदार आहोत हे तत्व लक्षात असेल तर अनेक प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत राहतील यात शंका नाही।छोट्याश्या या अनिश्चित आयुष्यात एवढं तरी संतुलन साधायचा प्रयत्न करू. समाजातील सर्वच घटकांचा थोड़ा थोड़ा का होईना या तराजूला हातभार लागू दे.म्हणजे एक एक पाऊल पुढे टाकून आजच्या घडीला रुंद होत चाललेली अविश्वासाची दरी भरून निघायला मदत होईल।

आपल्या उंबरठ्यावर इमानाचा,माणुसकीचा एक दिवा लावताना,त्याचा प्रकाश शेजारच्या घरी पण पडावा।म्हणजे प्रकाशात प्रकाश मिसळून ,भेदभावाचा अंधार दूर होईल । हातात हात येऊन ,माणसाला माणूस जोडला जाईल आणि एका घट्ट बंधनात आपला देश गुंफला जाईल,हीच आशा उराशी बाळगून आपल्याला व आपल्या परिवाराला दिवाळीच्या शुभेच्छा देतो।जय हिंद…

मनिष गोखले 
पुणे  









       

No comments: