Sunday, October 11, 2015

अमिताभ आणि रफ़ी 

११ ऑक्टोबर १९४२ ला जन्मलेला अमिताभ, आज ७३ वर्षाचा झालाय।हरिवंशराय बच्चन यांच्या सारख्या महाकवीचा हा सुपुत्र।नुसता रुपेरी पडद्यावरचा महानायकच नाही तर असल जीवनातही त्याचा अत्यंत सुसंकृत वावर।भाषा हिंदी असो वा इंग्रजी,अमिताभ कडून सदैव शुद्ध भाषेचीच खात्री।आदर्श असं त्याचं व्यक्तिमत्व।

साधारण ३ वर्षापुर्वी रफ़ी साहेबांच्या सुनेनी लिहिलेल्या एका पुस्तक (Mohd.Rafi :My Abba) प्रकाशनावेळी तो रफ़ी साहेबांविषयी भरभरुन बोलला।रफ़ी साहेबांचं अस्तित्व हे दैवी होतं।जिथे जिथे ते जायचे,एक प्रसन्नतेचं वलय आपोआप निर्माण व्हायचं।पुढे अमितभनी एक किस्सा सांगितला,तो खुप बोलका आहे.

साधारण १९७७ ची गोष्ट। पृथ्वीराज कपूर यांच्या स्मृती प्रित्यर्थ कपूर खानदानानी दोन दिवसांचा एक संगीत समारोह सिलीगुड़ी (पश्चिम बंगाल) इथे आयोजित केला होता।पहिल्या दिवशी रफ़ी साहेबांचा कार्यक्रम होता।जो त्यांनी नेहमी सारखाच अत्यंत प्रभावीपणे सादर केला। दुसऱ्या दिवशी मुंबईहून अन्य काही गायक येऊन गाणार होते। सम्पूर्ण कार्यक्रमविषयी स्थानिक लोकांमधे कमालीची उत्सुकता होती।पहिल्या रात्रीचा आपला कार्यक्रम आटपून रफ़ी साहेब दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबई कड़े रवाना झाले।साधारण सकाळी दहाचं त्यांचं विमान होतं।इकडे दुसऱ्या दिवशी कार्यक्रमासाठी येणारे गायकवर्ग, काही कारणास्तव येवू शकणार नसल्याची अचानक बातमी आली.शशी कपूर यांच्या समोर आता पेच निर्माण झाला। त्यानी अमिताभला लवकरात लवकर विमानतळावर जाऊन,कसंही करून रफ़ी साहेबांना थांबवण्याची विनंती केली।त्या काळी सिलिगुड़ीचं विमानतळ हे शहरापासून बरंच लांब होतं।अमिताभ कसाबसा दहाच्या सुमारास विमानतळावर पोहोचला।घाईघाईने विमानतळ अधिकाऱ्याला त्यानं गाठलं व काहीही करून ते विमान थांबवण्याची विनंती केली।त्वरित हालचाली सुरु झाल्या व सुटण्याच्या बेतात असलेलं ते विमान थांबवण्यात आलं. अमिताभ आणि तो अधिकारी विमानात दाखल झाले।साक्षात अमिताभ बच्चन विमानात अवतारल्यानं प्रवाश्यांमधे एकच खळबळ उडाली।अधिकाऱ्यांनी सर्वांना शांत केलं व अमिताभला ते रफ़ी साहेबांपर्यंत घेवून गेले।

अमिताभ,आपल्या भाषणात पुढे म्हणतो,नेहमी प्रमाणेच शांत चित्तानं रफ़ी साहेब बसलेले होते। एकदम अमिताभ ला समोर पाहून त्यांनाही थोडं आश्चर्य वाटलं। तो म्हणतो I folded my hands and made a request to stay. रफ़ी साहेबांनी एका क्षणाचाही विलंब न लावता,त्याच्या विनंतीला होकर दिला। तो म्हणतो,त्या क्षणी कुठेही रफ़ी साहेबांच्या मनाला अहंकार शिवल्याचा भासही झाला नाही।त्यांची ही खिलाडू वृत्ती माझे डोळे ओले करून गेली।रफ़ी साहेब दुसऱ्या दिवशीही तेवढंच समरसून गायले,हे वेगळं सांगायला नकोच।अमिताभ पुढे नमूद करतो की रफ़ी साहेबांना लोक फरिश्ता का म्हणतात,हे त्या दिवशी मला कळलं।

दोन महान कलाकारांची ही कहाणी।मोठया मनाची माणसंच खऱ्या अर्थानं मोठी होतात,मग तो अमिताभ असो किंवा रफ़ी साहेब।
अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा।     

No comments: