Friday, July 31, 2015

 रफ़ी साहेबांचा शेवटचा दिवस--३१ जुलै १९८०

आज गुरुपूर्णिमा।गुरुपूर्णिमा हा आपल्या गुरुला वंदन करण्याचा दिवस।
नुसतं आपल्या संगीताने या सर्वांना मंत्र मुग्ध करणारेच नाहीत तर आपल्या संपूर्ण आयुष्यद्वारे तमाम जगाला मानवतेचा एक हळवा स्पर्श देणारे एक संत,अशी रफ़ी साहेबांची ओळख.आज त्यांची ३५ वी पुण्यतिथी।हा थोड़ासा प्रयत्न त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांमधे डोकवून पाहण्याच्या,त्यांना अजुन समजून घेण्याचा।

आपल्या नित्याप्रमाणे रफ़ी साहेब पहाटे उठले। साधारण सकाळी १० वाजता त्यांनी मशहूर बंगाली संगीतकार 
श्यामल मित्रा यांना आपल्या घरी बोलवलं होतं। काही दिवसातच येणाऱ्या दुर्गापूजेसाठी त्यांना आरत्या बसवायच्या होत्या. रफ़ी साहेब बैडमिंटन खेळून,आपला रियाज़ आटपून तयार होते. 

ठरल्या वेळेप्रमाणे श्यामल मित्रा आले. सुरवातीच्या चहापानानंतर संगीत सेवेला प्रारंभ झाला।रफ़ी साहेब 
मात्र थोड़े अस्वस्थ होते. एक दोन वेळा श्यामल मित्रांनी त्यांना तब्येती बद्दल विचारलं तेव्हा रफ़ी साहेबांनी आपला रियाज़ सुरु ठेवण्याबद्दल हरकत नसल्याचं सांगितलं पण काही वेळातच बेचैनी असह्य झाली।आणि रफ़ी साहेब मित्रांच्या परवानगीने थोड़ा आराम करायला आपल्या खोलीत गेले. रफ़ी साहेबांच्या घरच्या लोकांना  चिंता वाटायला  लागली। रफ़ी साहेबांचे मेव्हणे ज़हीर बारी यांनी फॅमिली डॉक्टरांना बोलवलं। त्यांना ह्रदयविकाराच्या झटक्याची आशंका आली.प्राथमिक तपासणी नंतर त्यांनी रफ़ी साहेबांना जवळच्या नेशनल हॉस्पिटल मधे नेण्यास सांगितलं।

बिल्क़िस बानो (रफींच्या पत्नी) यांनी श्यामल मित्रा यांना रफ़ी साहेबांच्या तब्बेतीची बातमी सांगितली व
दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितलं।रफ़ी साहेब चालतच घराबाहेर पडले।आपल्या गाडीतून नेशनल हॉस्पिटल मधे गेले।

नेशनल हॉस्पिटल मधल्या डॉक्टरांनी रफ़ी साहेबांचा ECG केला।परिस्थितितीचे गांभीर्य लक्षात घेवून बॉम्बे हॉस्पिटल मधे नेण्यास सांगितलं।तो पर्यंत रफ़ी साहेबंच्या जवळच्या लोकांना थोड़ी खबर लागली होती.
आताशा रफींची तब्येत खालवायला लागली होती. ह्रदय आक्रोश करायला लागलं होतं।मनुष्याच्या हातून, आयुष्याचा प्रश्न देवाच्या दरबारी पोहोचला होता।

त्याही अवस्थेत रफ़ी साहेब मात्र अल्लाह ची माफ़ी मागत होते. त्यांच्या मनाला एक टोचणी लागली होती. श्यामल मित्रांना परत जावं लागलं,ही गोष्ट त्यांच्या मनातून जात नव्हती।या वरून रफ़ीसाहेबांच्या मनाची,त्यांच्या माणुसकीची कल्पना येते।साक्षात मृत्यू समोर असतानाही ते दुसऱ्याचाच विचार करत होते.

त्या पावसाळी वातावरणात बाहेर वादळ सुटलेलं होतं। रफ़ी साहेबांच्या हृदयात वीज चमकत होती।डॉक्टरांचे
प्रयत्न अपूरे पडत होते।शेवटी रात्री १० वाजून २५ मि नी आपल्या असंख्य गीतांना श्वास देणाऱ्या रफ़ी
साहेबांनी आपला अखेरचा श्वास घेतला।

डॉक्टरांना देखील हुंदका आवरत नव्हता।कारण रफ़ी साहेबांचं असं जाणं  म्हणजे सर्वांसाठी आपल्या वरची छत्रछाया निघून जाण्यासारखं होतं।

तो टीवी आणि इंटरनेट चा जमाना नसूनही ही बातमी वेड्यासारखी पसरली। असंख्य जीव हळहळले,करोडो डोळ्यांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली,हजारो पावलं मुंबईच्या दिशेनी वळली। या देवदूतावरच्या प्रेमानी
हे घडवलं होतं।

दुसऱ्या दिवशी १ ऑगस्ट ला,आतापर्यंतची(चित्रपट सृष्टीतील) सर्वात मोठी यात्रा निघाली। हळूहळू जूहू कब्रस्तानकडे रफ़ी साहेब आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत निघाले होते. व संध्याकाळी चार वाजून पंचेचाळीस मि नी ते एकटेच पुढे गेले आणि धरती मातेच्या गर्भात विसावले।

आजही मी पाहतो,रफ़ी साहेबांचे नाव येताच लोक हळवे होतात.त्या हळव्या मनावर फुंकर घालण्यासाठी लोकांना पुन्हा रफ़ी नावाच्या स्वराचाच आधार घ्यावा लागतो।

नाही तरी रफ़ी साहेबांनीच म्हणून ठेवलय,

जी करता है जीते जी मै यु ही गाता जाउ
गर्दिश में थके हारो का माथा सहलाता जाऊ


रफ़ी साहेबांना विनम्र श्रद्धांजली।।।।


मनीष गोखले
पुणे
9822859270









No comments: