Thursday, May 12, 2016

किशोर कुमार आणि दादामुनी

आज किशोर कुमार यांचा स्मृतिदिन।तसंच आजच त्यांचे मोठे बंधू अशोक कुमारजी म्हणजेच दादामुनी यांचा जन्मदिवस।किती विचित्र योग आहे,की आयुष्याच्या या खेळात ज्या दिवशी एकानी एंट्री घेतली,तोच त्याच्या सख्या भावासाठी शेवटचा दिवस ठरावा।दोघांमधे तब्बल वीस वर्षाचं अंतर।दोघही आपापल्या ठिकाणी महानच।

बरोबर,१५ वर्षा पूर्वीची गोष्ट आहे.१९ ऑक्टोबर २००० चा दिवस होता. काही कारणास्तव मुंबईला जाण्याचं निमित्त झालं. जे काम होतं ते लवकर झालं. परतीची विदर्भ एक्सप्रेस रात्री आठची होती. बराचसा वेळ हातात शिल्लक होता. सायन भागात वाटेत कुठेतरी फुटपाथ वर मुंबईची माहिती असणारं एक पुस्तक सहज पाहत होतो. त्यात बऱ्याच चित्रपट तार्यांचे पत्ते आणि दूरध्वनी क्रमांक दिले होते. खरं तर चित्रपट सृष्टीमुळे मुंबईचं,भारतात विशेष आकर्षण आहे.मी ही त्यातलाच. पुस्तक पाहता पाहता त्यात अशोक कुमारजीचा पत्ता दिला होता. ४७,यूनियन पार्क,चेम्बूर. सायन पासून ते ठिकाण फारसं लांब नव्हतं असं कळलं. मग काय. काही मिनटातच दादामुनींच्या फटकाशी येऊन पोहोचलो. खरं तर पहिल्यांदाच कुठल्याही सिने कलाकराला भेटणार होतो. फाटकातच सिक्युरिटी गार्ड नी अडवलं. काय काम आहे?वगैरे विचारणा झाली. ते भेटणार नाहीत असं त्यानं स्वत: तर्फे सांगून टाकलं. मी मग जवळचा टेलीफोन बूथ शोधला व अशोक कुमार जी ना फ़ोन लावला।मी अमरावतीहून आलोय आणि भेटायची इच्छा आहे असं सांगितलं. दादामुनि मेहरबान झाले. भेटायला तयार झाले. मग धावत धावत पुन्हा त्यांच्या बंगल्यापाशी येऊन धडकलो.
सिक्योरिटी गार्ड  परत आडवा आला.पण या वेळा दादा मुनींची देखभाल करणाऱ्या नर्स बाईनी वरुन "उन्हें अंदर आने दिजिये' असा आदेश दिला. मी घरात प्रवेश केला,दादा पहिल्या मजल्यावर होते. खाली त्यांची व किशोर कुमार यांची आणि बहादुरशाह जफ़र यांची तस्वीर लावली होती.
पहिल्या मजल्यावर गेलो. साक्षात अशोक कुमारजी यांना आपण बघत आहोत,काही क्षण डोळ्यावर विश्वास बसणं कठीण होत होतं. त्यांना नमस्कार केला. 'बेटा कहा से आये हो' असा सवाल करत एका कागदावर माझ्याकडून माझा पत्ता लिहून घेतला.  अशोक कुमारजी तेव्हा ९० वर्षाचे होते. कोणीतरी त्यांना भेटायला आलंय,हे त्यांना सुखावून गेलं. पण काही क्षणातच त्यांच्या डोळ्यात पाणी आलं.'बेटा आजकल मुझसे मिलने कोई नहीं आता.मेरा तो सारा सामान भी चोरी हो गया है" आणि खरोखरच त्यांच्या घरात फार कमी वस्तू होत्या. ही गोष्ट जाणवण्यासारखी होती. सोबत एक साधा कॅमेरा होता. त्यांच्या संमतीने त्यांच्या सोबत फोटो काढले.
माझ्यासाठी त्यांना भेटणं,किती मोठा क्षण होता,हे कदाचित मी त्यांना सांगू शकलो नाही. पुन्हा त्यांचे आशीर्वाद घेतले आणि परत निघालो. रात्रभर त्या रेलवे मधे झोप लागली नाही. अमरावतीला पोहोचल्यावर फ़ोन कर,असा दादाजींचा आदेश दुसऱ्या दिवशी सकाळी पाळला.

एका एवढ्या मोठया कलाकराचं ते एकटेपण,त्याच्या डोळ्यात आलेले अश्रू मला मात्र अंतर्मुख करून गेले.
माझी भेट झाल्यावर साधारण एक वर्षानी  म्हणजेच १० दिसंबर २००१ ला ते गेले. अंत्यविधिला खरोखरच काही घरच्या मंडळींच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. मृतावस्थेतही त्यांच्या डोळ्यावर काळा गॉगल असल्याचं तेव्हा टीवी वर पाहिलं होतं,डोळ्यातलं दुःख जाता जाताही ते असं लपवून गेले असावेत.

माणूस सदैव कुठल्यातरी सुखासाठी धडपडत असतो. भरपूर पैसा असला म्हणजेच खरं सुख आपल्याला मिळेल अशा त्याच्या कल्पना असतात. अर्थात बरीचशी भौतिक सुखं, तो पैशाच्या सहाय्याने विकत घेऊ शकतो,ही बाब पण नाकारता येत नाही. पण माणसाच्या मनाची तृप्ती ही भौतिक सुखावर कधीच होत नाही.
पैसा आहे,संपत्ती आहे,धन-धान्य आहे पण जर तुमच्यावर प्रेम करणारं माणूस तुमच्या जवळ नाही तर खऱ्या अर्थाने, ते सगळं भौतिक ऐश्वर्य शून्यं होऊन जातं. या शून्यापलीकडे मनुष्याच्या डोळ्यांना खरा शोध असतो तो त्या डोळ्यांचा,ज्यांच्या अंतरंगात वसलेल्या सागरात,फक्त मायेच्या,प्रेमाच्या लाटा असतात. अशी साथच त्याच्या मनाला,समाधानाचा एक ओलावा देऊ शकते. मग दारिद्र्य असलं तरी एकटेपणा नसतो. आपण जगात अशी किती तरी उदाहरणं पाहतो की ज्यांच्याकडे पैसा,प्रसिद्धी,नाव,सर्व काही आहे पण त्यांच्या विश्वात,त्यांच्या मनाला साद देणारं असं कोणीच नाही. त्यांचं आयुष्यं एक प्रकारे शुष्क झालं आहे. म्हणूनच इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा, या जगात माणसाचं माणूसपण महत्त्वाचं ठरतं.








No comments: