Wednesday, December 17, 2014

स्वर-गंगेची गंगोत्री--कोटला सुल्तानसिंह 

एखादं झाड़ कितीही मोठं,डौलदार,बहारदार असलं,तरी त्याची मुळं नेहमी जमिनी सोबत जोडलेली असतात।झाड़ जेवढं मोठं,तेवढाच त्याच्या मुलांचा विस्तार व खोली मोठी।त्याच प्रमाणे जरी एखादी व्यक्ती आयुष्यात कितीही यशस्वी झाली आणि नावारुपास आली,तरीही ती सदैव आपलं जन्मस्थान व बालपण या सोबत एका निसर्ग नाळेने जोडलेली असते।आणि जर ती व्यक्ती रफ़ी साहेबांच्या दर्जाची असेल तर त्या जन्मस्थानाचं महत्त्व अजूनच वाढून जातं।

रफ़ी साहेबांनी गायलेली असंख्य गाणी आपण सर्वांनीच ऐकलेली आहेत।त्यांच्या साध्या,सरळ स्वभावाचे किस्सेही आपल्याला माहिती आहेत।रफ़ी साहेबांविषयी निश्चितच एक आदरभाव सर्वांच्या मनात आहे.
बरेच वर्ष एक इच्छा मनाला साद घालत होती,रफ़ी साहेबांच्या जन्मस्थळा विषयी जाणून घेण्याची,तिथे भेट देण्याची।आणि अलीकडेच रफ़ी साहेबांच्या जन्मगावी जाण्याचा,तिथल्या वातावरणात मन भरून श्वास घेण्याचा योग ही जुळून आला.हो,अमृतसर जिल्ह्यातल्या त्या छोट्याशा गावाची खरी ओळख 'रफ़ी साहब का गाव' अशीच आहे… कोटला सुल्तानसिंह या नावाचं अस्तित्व रफ़ी साहेबांमुळेच आहे,असं म्हटलं तर 
अतिशयोक्ती ठरणार नाही।

२४ डिसेम्बर १९२४ ला रफ़ी साहेबांचा जन्म झाला।१९३८ पर्यन्त ते आणि त्यांचा परिवार त्या गावात राहत होता.रफींचे वडील एक खानसामा होते. 
१९३८ ला मात्र रफ़ी कुटुंब लाहौरला गेलं।

मजीठा तहसील मधे असलेलं हे सुन्दर गाव(तिथल्या भाषेत त्याला पिण्ड असं म्हणतात) अमृतसर शहराच्या उत्तरेला साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे. जशी पंजाब मधील एखाद्या खेड्याची व आसपासच्या  परिसराची एक छबि आपल्या मनामधे असते,ते गाव,तो परिसरही त्याला अपवाद नाही।रस्त्याच्या दोन्ही बाजूला मनमोहक शेती,त्यांना फुलवणारे ते कालवे,आपल्या मनाला भुरळ घालतात।कुठेतरी थांबून 'सरसो दा साग,मकई दी रोटी' खाण्याची इच्छा नाही झाली तरच नवल.हे सगळं वाटत असताना मात्र एक प्रचंड उत्सुकता मनात पिंगा घालत होती. रफ़ी नावाच्या स्वर गंगेची ती गंगोत्री कशी असेल हे कुतूहल काहीसं अस्वस्थ करत होतं। त्या विचारात गढ़ता गढ़ता त्या गावात आम्ही आलो सुद्धा।

त्या अनोळखी लोकांच्या चेहऱ्यावरील अभिमानानी(घमेंड नव्हे) आमचं स्वागत केलं।तो अभिमान अर्थातच रफ़ी साहेबांविषयीचा होता,हे वेगळं सांगायला नको. त्यातला एक जण आम्हाला एका वृद्ध व्यक्तीकड़े घेवून गेला।
ती व्यक्ती म्हणजे सरदार गुरबक्श सिंह।रफ़ी साहेब जेव्हा त्या गावात राहत होते,तेव्हा गुरबक्श जी कोटला सुल्तान सिंह चे सरपंच होते। अशा व्यक्तीला भेटणं हे खरोखरच आमचं भाग्य होतं। तेच आम्हाला रफ़ी साहेब जिथे वास्तव्याला होते,त्या ठिकाणी घेवून गेले।माझं मन उत्सुकतेची परिसीमा गाठत होतं। काही क्षणातच आम्ही त्या जागी पोहोचलो।

रफ़ी साहेबांचे जे घर मालक होते,आता त्यांची चौथी पीढ़ी होती।एका जाम्भळाच्या झाडाच्या छायेत असणारी मोकळी जागा त्यांनी दाखवली। तिथेच त्या काळी (१९२४ ते १९३८)रफींचं झोपडीवजा घर होतं।त्या छोट्याश्या जागेत बागडणाऱ्या एका मुलाने,आपल्या सुरांमुळे जग काबिज केलंय आणि आपण स्वत: त्या जागी आहोत,या वर काही क्षण विश्वास बसत नव्हता।त्या जाम्भळाची गोडी रफ़ी साहेबांच्या गळ्यात व स्वभावात तर उतरली नसावी ना,असाही एक विचार मनाला स्पर्श करून गेला। ज्या मातीत रफींचं आयुष्य उमललं,ती माती आपल्या बरोबर न्यावी अशी इच्छा होती।घरमालकांच्या परवानगीने त्या जागेची थोड़ी माती घेतली।आयुष्यभर पूरणारी ती एक आठवण आता माझ्या सोबत होती।

जवळंच रफ़ी साहेबांचे एक वर्गमित्र राहत असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं.सरदार बक्शीश सिंह हे त्यांचं नाव. त्यांच्या घरी गेलो। बक्शीश सिंह जी रफीच्या आठवणीत रमले।रफ़ी हे अत्यंत शांत व लाजाळु होते।
आम्ही त्यांना 'फीको' म्हणूनच हाक मारत असू,हे ही सांगायला ते विसरले नाहीत।रफींच्या सोबतचे त्यांचे ते जुन्या काळचे फोटो पाहून मजा वाटत होती. रफ़ी कोटला सोडल्यानंतर इच्छा असूनही कधी गावात परत येऊ शकले नाहीत,ही एक छोटीशी खंत त्यांच्या बोलण्यात जाणवत होती।

रफ़ी साहेबांच्या गावात एक फ़क़ीर,पंजाबी सूफी गाणी म्हणत नेहमी यायचा।बाल रफ़ील नेहमीच त्याचं आकर्षण वाटायचं।तो त्या फकीराच्या मागे मागे जायचा आणि त्यानी गायलेली गाणी दिवसभर गुणगुणत राहायचा।गाण्याच्या आवडीचा स्त्रोत म्हणजे तो फकीरच होता,हे स्वत:रफ़ी साहेब अनेकदा सांगायचे।

रफ़ी साहेब ज्या शाळेत शिकले ती शाळा मोठ्या अभिमानानी आज ही उभी आहे. गावातील लोकांनी रफींच्या नावानी एक सभागृह पण बांधले आहे.
असं सांगतात की बालरफ़ीनी एका झाडावर आपलं नाव कोरलं होतं,पण 
कुठल्यातरी अरसिक व्यक्तीची कुऱ्हाड त्यावर चालली आणि ही बहुमुल्य आठवण नष्ट झाली।

रफ़ी साहेब ३१ जुलॆ १९८० ल गेले.केवळ पंचावन्न वर्ष,सात महीने,सात दिवसांचं आयुष्य त्यांना लाभलं।पण त्यांच्या सुरांचा,आठवणींचा झरा रसिकांच्या हृदयात अजूनही प्रवाहीत आहे।रफ़ीच्या आयुष्यबरोबरच या निर्मळ प्रवाहाचंही कोटला सुल्तान सिंह हे उगमस्थान आहे.या सुन्दर गावाची आठवण घेवून अमृतसरकड़े निघालो। ती शाळा,जाम्भळाचं झाड़,भेटलेली माणसं हे सगळं मनात डोकवत होतं।परतीच्या प्रवासात माझ्यातल्या कवीनी मात्र त्या गावाबद्दल शब्द कागदावर उतरवायला सुरवात केली।

बहते बहते हवा अक्सर रुका करती है वहा 
हसीं फूलों की डालियाँ झुका करती है वहा 
मुकाम था कभी जिसका उस फ़रिश्ते की खातिर 
महफ़िल कुल कायनात की सजा करती है वहा.

हैप्पी बर्थडे रफ़ी साहेब।।।।।।

मनीष गोखले 
पुणे 
9822859270 














No comments: